Future of communication is Brain to Brain

कधी कधी आपल्याला साधा संवाद करताना सुद्धा, आपल्याच मातृभाषेत चपखल शब्द आठवत नाही. विशेषतः आपण काहीश्या दडपणाखाली असल्यास. मग ते अगदी एका शब्दात दिशा सांगणे असो की एका वाक्यात काही मदत मागणे असो. पण आता हताश होण्याचे काही कारण नाही. विचार करा की बोलण्या-लिहिण्यासाठी आपल्याला जर शब्दांची गरजच उरली नाही तर? भाषेचे बंधनच राहिले नाही तर? होय, भविष्यातील संवाद हा शब्द, भाषा किंवा कृती याच्याही पलीकडे जाऊन ब्रेन-टू-ब्रेन अर्थात थेट मेंदू-ते-मेंदू शक्य आहे. संशोधकांनी शास्त्रोक्त प्रयोगांसह तसे सिद्ध केले आहे. फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्ग यांनी देखील ‘सोशियल-नेटवर्क’ नंतर पुढे काय? तर ‘ब्रेन-नेटवर्क’ असे सुतोवात केले आहे. तंत्रज्ञानातील जवळ जवळ सर्वच अग्रेसर कंपन्यांनी टेलिपॅथी, जो कधीकाळी आपल्याला कल्पनाविलास वाटत होता तो नजीकच्या काळात प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरु केली आहे. आणि त्याला कारणही तसेच आहे.

Future of Communication is Brain to Brain - Sunil Khandbahale
Future of Communication is Brain to Brain – Sunil Khandbahale

वर्ष २०१८ च्या अखेरच्या टप्प्यात प्रकाशित झालेले, वाशिंग्टन विद्यापीठाचे डॉ. राजेश राव आणि त्यांच्या चमूचे ब्रेन-नेट संशोधन जगभर उत्सुकतेचा विषय ठरले. ज्ञात इतिहासात प्रथमच दोनहून अधिक व्यक्तींच्या ब्रेन-टू-ब्रेन कम्युनिकेशनचा प्रयोग करण्यात संशोधकांना यश प्राप्त झाले. इलेक्ट्रोइन्सफ्लोग्राफी तंत्रज्ञान (इ.इ.जी.) व इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांचे मेंदू जोडलेल्या परंतु प्रत्यक्षात दूरवर असलेल्या तीन व्यक्तीच्या पाच वेगवेगळ्या प्रयोगांत ‘टेट्रिस’ सारखा कोड्यांचा खेळ खेळण्यात आला. त्यामध्ये सूचना करणाऱ्या दोन व्यक्ती संगणकाच्या पडद्यावर खेळ फक्त बघू शकतात परंतु कृती करू शकत नाही आणि तिसरा सूचना पाळणारा व्यक्ती फक्त कृती करू शकतो परंतु खेळ बघू शकत नाही अशी योजना करण्यात आली होती. परिणाम खूपच दिशादर्शक मिळाले. तब्ब्ल ८१.२५% अचूकता नोंदविण्यात आली. आणि इतकेच नाही तर सूचना पाळणाऱ्याने “आपल्याला सूचना पाठविणारा मुद्दाम फसवत तर नाही ना?” याचाही अचूक पडताळा केला.

याआधी, २०१४ मध्ये स्पेन देशातील संशोधकांनी, ३२१८ किलोमीटर अंतरावर असलेल्या दोन व्यक्तींमध्ये घडवून आणलेल्या ब्रेन-टू-ब्रेन संवादात २० वस्तुनिष्ठ प्रश्नावलींची उकल करण्यात यश मिळवले होते. प्राण्यांच्या मेंदूच्या चेतासंस्थेतील असंख्य पेशींचा संवाद हा न्यूरोट्रान्समीटर्स अर्थात रासायनिक संकेतांच्या मार्फत होत असतो. या प्रक्रियेत इलेक्ट्रिकल स्पाईक्स अर्थात विद्युत मेख तयार होतात की ज्यांमुळे शरीरातील विविध कृती घडत असतात. या विज्ञानावर आधारित २०१३ मध्ये ड्यूक विद्यापीठाच्या संशोधकांनी मेंदूमध्ये मायक्रोचिप जोडलेल्या दोन उंदरांमध्ये संदेशांची यशस्वी देवाणघेवाण घडवून आणली. ड्यूक न्यूरोबायोलॉजीच्या नीकोलेलीस प्रयोगशाळेत माकडांचे हातवारे मेंदू व आभासी तंत्रज्ञानाचा वापर करून नियंत्रित केले गेले होते. कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठाने मेंदूमधून उत्सर्जित होणाऱ्या लहरींद्वारे व्यक्ती बघत असलेल्या चित्रफितींची प्रतिमा तयार करण्यात यश मिळवले.

पत्र-व्यवहार ते सामाजिक माध्यमे अशी अकल्पित प्रगती झालेल्या माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाच्या गतिशील युगात, प्रोसेसरची प्रचंड शक्ती व इंटरनेटचा वेग दिवसागणिक वाढत आहे. इंटरनेट-ऑफ-एव्हरीथिंग, डिप-मशीन-लर्निंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखी तंत्रज्ञानाची झेप बघता नजीकच्या काळात अखंड मानव जातीला वरदान ठरू शकेल अशा सामाजिक नियमन व नैतिक मूल्यांनी नियंत्रित, गोपनीयता व सुरक्षिततापूर्ण, नवप्रवर्तक, अभिनव व सृजनशील ब्रेन-नेटवर्क तंत्रज्ञानाची आपण आशा करू शकतो. आणि त्याही पलीकडे शब्द-भाषा-आवाज यांच्या परिसीमा गळून पडल्याने फक्त मानवजातच नाही तर वृक्ष-वेली-पशु-पक्षांसह संपूर्ण जीवसृष्टीसोबत आपण ब्रेन-टू-ब्रेन संवाद साधू शकतो. हो, अगदी परग्रहावरील जीवसृष्टीसोबत सुद्धा ! शेवटी भावभावना ह्या वैश्विकच असतात ना?
– सुनील खांडबहाले ( Sunil Khandbahale) 

 

1 Comment

  1. Namaste.
    Will like to meet you for some discussion while in Nashik /Pune.
    Please let me know when it is possible.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You might like

© 2023 Blog - WordPress Theme by WPEnjoy