मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा

इंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रभावामुळे २०२० अखेरपर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. एका बाजूला वाढते शहरीकरण, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, इमारती व वाहनांची भाऊगर्दी अशा समस्या क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तन. जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ शकतो यावर आधारित ही नवीन पाक्षिक लेखमाला…

जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ शकतो यावर आधारित ही नवीन पाक्षिक लेखमाला

मानवाने आपल्या ‘नैसर्गिक-बुद्धिमत्ते’च्या जोरावर यंत्र बनवलं. आता यंत्रच नवीन यंत्र बनवत आहेत. त्यासाठी उपलब्ध माहिती, पूर्वानुभव आणि पूर्वानुमान यांचा प्रभावी वापर यंत्र करत आहेत. याच प्रक्रियेला “कृत्रिम-बुद्धिमत्ता’ अर्थात “आर्टिफिशियल-इंटेलिजन्स’ संक्षिप्तरूपाने “ए.आय.’ म्हणतात. संगणक शास्त्रात “कृत्रिम अथवा यांत्रिक’ अशी संबोधली जाणारी बुद्धिमत्ता “मानवी नैसर्गिक बुद्धिमत्तेचा पुढचा टप्पा” सिद्ध होऊ पाहत आहे. खरे तर “ए.आय.’ चे नामकरण झाले १९५६ मध्ये. तसे त्याचे बीजारोपण १९५० मध्येच जटिल समस्या सोडवण्यासाठी व सांकेतिक पद्धतीसाठी आणि पुढे १९६० मध्ये अमेरिकी संरक्षण विभागाने तर १९७० मध्ये दारपा (DARPA) रस्ते नाकाशा निर्मितीसाठी केले होते, जो पुढे २००३ मध्ये स्वीय सहायक यंत्रणा म्हणून वापरला गेला. हॉलीवूड-बॉलीवूड सिनेमांमध्ये अतिरेकाने मनोरंजनात्मक भ्रामक कल्पना दाखवितात तसे हे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विघातक नाही तर ते जगाचे उज्ज्वल भविष्य घडवू पाहत आहे. विचार करा की, आपली घरं आता फक्त जमिनीवरच नाही तर समुद्रात आणि आकाशातदेखील असतील, विनावाहक मोटारगाड्या फक्त रस्त्यावरच चालताना नाही तर आकाशातही उडताना दिसतील, हजारो मैल असलेले आपले आप्तस्वकीय फक्त संगणकाच्या पडद्यावरच नाहीत तर अगदी आपल्या जवळ असलेली भासतील आणि एवढंच नाही तर तुम्ही निरोगी आयुष्यमानाचीही अपेक्षा धरली तर…? अतिशयोक्ती वाटतं ना? पण हे नजीकच्या काळात प्रत्यक्षात साकारल्यास आश्चर्य वाटू नये. कारण जगभरात असेच एक ना अनेक प्रयोग यशस्वी करण्यात कैक शास्त्रज्ञ अहोरात्र झटत आहेत. आताचे युग हे माहितीच्या आदानप्रदानाचे युग आहे हे वेगळे सांगावयास नको. २.५ क्वेन्टीलियन डाटाची निर्मिती दर दिवसाला होत आहे. दररोज निर्माण होणारा हा डाटा इतका मोठा आहे की, जगभरात असलेला ९० टक्के डाटा केवळ गेल्या दोन-तीन वर्षांत निर्माण झाला आहे. बिग-डाटाच्या प्रभावामुळेच संशोधनाची गती वाढण्यास नजीकच्या काळात मदत झाली आहे. मानवाच्या वाढत्या गरजा भागवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन क्षेत्रात गुगल, मायक्रोसॉफ्ट, अॅपल, अॅमेझॉनसारख्या बलाढ्य कंपन्या त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक जास्त गुंतवणूक करत आहेत.

गंभीर अपघाताच्या वेळी अथवा शस्त्रक्रिया करताना केवळ १२ सेकंदात रक्तस्राव थांबवू शकेल अशा शेवाळ आधारित जेलचा शोध, जिभेवर ठेवताच तात्काळ विरघळणारी थ्रीडी प्रिंटेड औषधी गोळी, अतिवृष्टीच्या परिस्थितीत जलप्रलय टाळता यावे यासाठी एका मिनिटात ३००० लिटर पाणी शोषणारे सिमेंट, मानवी मलमूत्रापासून शुद्ध पाणी आणि ऊर्जानिर्मिती, डीएनएमध्ये आवश्यक बदल घडवणारा शोध, ज्यामुळे जिनोममध्ये संभाव्य आजाराचा नको असलेला कोड काढून त्या जागी नवीन कोड बसवणे, इबोला रोगप्रतिबंधक लस, रोगप्रतिबंधक डास, कारमध्ये परावर्तित होणारे विमान यांसह केवळ ५०० रुपयांत संगणक निर्मितीचे संशोधन सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहे.

इंटरनेट ऑफ थिंग्जच्या प्रभावामुळे २०२० अखेर पर्यंत साधारणतः ३ हजार कोटी साधने एकमेकांना जोडली जाण्याचा अंदाज आहे. मानवी शरीर तसेच बांधकाम वस्तूंमध्ये नॅनोसेंसर स्थापित करून वैद्यकीय, शेती, स्थापत्य व औषधनिर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती होऊ शकेल. सोडियम, झिंक आणि अॅल्युमिनियम आधारित बॅटरीमुळे पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि २४ तास खात्रीशीर वीज मिळू शकेल अशी अक्षय ऊर्जानिर्मिती शक्य झाल्याने दुर्गम भागातील खेडीपाडीही प्रकाशमय होण्याची आशा निर्माण झाली आहे. ऑटोनॉमस व्हेईकल अर्थात सेल्फ-ड्रायव्हिंग कार क्षेत्रात अनेक कंपन्यांनी रस घेतला असून त्यामुळे अपघात तसेच संभाव्य जीवितहानी टाळणे, प्रदूषण निर्मूलन व ज्येष्ठ तसेच दिव्यांग व्यक्तींचे जीवन सुखकर होण्यास मदत होणार आहे. सभोवतालच्या वाय-फाय तसेच दूरभाष लहरींच्याद्वारे आपली इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक उपकरणे विद्युतभारित करणे शक्य आहे. भविष्यात इमारती, रस्ते, गाड्या आपल्याशी मानवाप्रमाणे संवाद करू लागल्यास आश्चर्य वाटू नये. रोबोट्स रोबोट्सला शिकवतील, धुळीच्या प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी व्यक्तिगत हवा-शुद्धक यंत्र, संततीहीन जोडप्यांसाठी अगदी खऱ्या वाटाव्यात अशा भावनायुक्त बाहुल्या, ऑर्गन-ऑन-चिप, वाढत्या मधुमेही रुग्णांची संख्या लक्षात घेता रक्तातील साखर नियंत्रणासाठी स्वयंचलित कृत्रिम स्वादुपिंड, स्पर्शविरहित तापमापक, भूकंप-रोधक बिछाना, घडी घालता येईल असे दुचाकी शिरस्त्राण (हेल्मेट), विजेच्या दिव्यांसह अनेक हवेत तरंगती उत्पादने असे बरेच काही भविष्यवेधी तंत्रज्ञान कार्यरत आहेत. एका बाजूला वाढते शहरीकरण, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, प्रदूषण, इमारती व वाहनांची भाऊगर्दी अशा समस्या क्लेशदायक ठरत आहेत. यावर निश्चित उत्तर म्हणजे तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तन. मानवी जीवनमान सुसह्य करण्यासाठी जगभर तंत्रज्ञानाचा नियोजनबद्ध वापर कसा केला जात आहे आणि आपल्याकडेही कसा केला जाऊ शकतो, याबद्दल आपण सर्व मिळून या सदरातील पुढील काही लेखांत चर्चा करूया.

published at : https://divyamarathi.bhaskar.com/news/the-next-stage-of-human-natural-intelligence-an-article-of-sunil-khandbahale-126434320.html

image link : https://digitalimages.bhaskar.com/divyamarathi/epaperimages/05012020/Mar26-1350972-large.jpg

Leave a Reply 1

Your email address will not be published. Required fields are marked *


Datta shivaji gite

Datta shivaji gite

आपण पुढील प्रवास वर्णन करत आहेत ते सत्यात उतरणार आहे