Future Internet : Yes, Internet can unite the world!

“The Future Internet will not be limited to only planet Earth, but will have the potential to connect the entire Universe!” – Sunil Khandbahale

“भविष्यातील इंटरनेटमध्ये फक्त पृथ्वीच नाही तर चंद्र, मंगळ किंबहुना संपूर्ण गॅलेक्सी – अर्थात आकाशगंगा सॅटेलाईट्स माध्यमातून जोडण्याचे सामर्थ्य असणार आहे. सर्व जग अनेक हिस्स्यांत वाटलं गेलेलं असताना, संपूर्ण जगाला एका धाग्यात बांधत विश्वशांतीचा अनुभव देण्याचं सामर्थ्य इंटरनेट तंत्रज्ञानात आहे. ते युनिव्हर्सल आहे. येस, इंटरनेट- कॅन-युनाईट-द-वर्ल्ड.” – सुनील खांडबहाले

अमेझॉनचे निर्माते जेफ बेझोस यांनी इंटरनेटची तुलना “विजेचा शोध” यासोबत केली होती आणि ते योग्य असंच होतं. कारण विजेचा शोध हा फक्त बल्ब पेटवून प्रकाश पाडण्यासाठीच्या उद्देशाने लावला होता, परंतु संशोधन, नाविन्यता आणि मानवी-बुद्धिमत्तेच्या जोरावर विजेच्या उपकरणांचे विविध प्रयोग उत्तरोत्तर विजेची उपयोगिता वाढवत गेले. इंटरनेटचंदेखील काहीसं असंच झालं.

कोविड-१९ कोरोनाव्हायरसच्या उद्रेकामुळे फिजिकल-अर्थात भौतिक जगात लॉकडाऊनसारखी नामुष्की ओढवली. जनजीवन ठप्प झालं. कल्पना करा की – जर उद्या असं काही व्हर्चुअल – अर्थात आभासी जगात घडलं तर? सायबर-वॉर किंवा तत्सम महाभयानक व्हायरसच्या हल्ल्यामुळे म्हणा किंवा काही तांत्रिक अडचणींमुळे, इंटरनेट खूप काळ म्हणजे काही महिने-वर्षे किंवा कायमचेच बंद पडले अथवा करावे लागले तर?… स्टॅटिस्टा व्यासपीठाद्वारे आयपीएसओएस संस्थेने जगातील २३ देशांच्या विविध लोकांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार, जगभरातील अधिकतम लोकांचं म्हणणं आहे की इंटरनेटशिवाय जग या केवळ संकल्पनेचा देखील ते विचार करू शकत नाहीत. भारताबद्दलच बोलायचं झालं तर हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे तब्ब्ल ८२% आहे.

इंटरनेट वर्ल्ड स्टॅटस संस्थेच्या आकडेवारीनुसार आजमितीस जगाच्या एकूण ७.८ अब्ज लोकसंख्येपैकी तब्ब्ल ४.६ अब्ज लोकसंख्या इंटरनेटचा वापर करते. सन १९९५ मध्ये १% पासून, सन २००० ते २०२० या दोन दशकांत इंटरनेट धारकांमध्ये १२६७% ची वृद्धी नोंदवली गेली. ही अधिकृत आकडेवारी – “अन्न, वस्त्र निवारा” सोबत इंटरनेट ही देखील मानवी-जीवनाची मूलभूत- गरज बनली असल्याचे अधोरेखित करते. याचं कारण म्हणजे इंटरनेट-आधारित तंत्रज्ञानात झालेली मोठी प्रगती. २००३ मध्ये अमेझॉनचे निर्माते जेफ बेझोस यांनी इंटरनेटची तुलना “विजेचा शोध” यासोबत केली होती. आणि ते योग्य असंच होतं. कारण विजेचा शोध हा फक्त बल्ब पेटवून प्रकाश पाडण्यासाठीच्या उद्देशाने लावला होता, परंतु संशोधन, नाविन्यता आणि मानवी-बुद्धिमत्तेच्या जोरावर विजेच्या उपकरणांचे विविध प्रयॊग उत्तरोत्तर विजेची उपयोगिता वाढवत गेले. इंटरनेटचंदेखील काहीसं असंच झालं.

परंतु असं जरी असलं तरी इंटरनेटशिवाय जग अगदी बंद वगैरे पडेल असं म्हणणं कुणाच्याही बुद्धीस पटण्यासारखं मात्र नक्कीच नाही. असं विश्वासपूर्वक मत मांडण्याचं कारण म्हणजे, इंटरनेटपूर्वीही जग-जीवन होतं आणि इंटरनेटशिवायदेखील ते राहणारंच आहे. जिथं अनेक प्रकारच्या महामारीसुद्धा मानवी जीवनाला थांबवू शकत नाहीत तिथं इंटरनेटची ती काय मजाल? अर्थात हे प्रत्येकाच्या मानणे न मानणे नाम-मानसिकतेवर अवलंबून आहे. एकीकडे इंटरनेट जगतातील स्पर्धा शिगेला पोहचलेली असताना मात्र जगातील निम्मी लोकसंख्या अजूनही स्थिर

इंटरनेट कनेक्टिव्हीटीपासून वंचित आहे हे सत्य नाकारता येणार नाही. इतकेतच नव्हे तर करोडो लोकांनी फोन म्हणून तो कशाशी खातात, त्यांना माहित नाही. एक मात्र निश्चित की, मानवी जीवन सुसह्य करण्याच्या शुद्ध हेतूने प्रगतीपथावर असलेल्या अद्ययावत जगात व्यक्तिगत व सामाजिक आरोग्याची मात्र अधोगती होताना दिसत आहे याविषयी दुमत नाही. अर्थात त्यासाठी सर्वस्वी तंत्रज्ञानाला जबाबदार धरणं कधीच शहाणपणाचं ठरणारं नाही. तंत्रज्ञान मूलतः नेहमी उदासीन असतं. कारण ते वस्तुतः जड आहे. तंत्रज्ञान वापरणारा कुणी एक चेतन व्यक्ती त्याची उपयुक्तता व त्याधारित परिणामास पात्र असतो. इंटरनेट युगात माहितीचा महापूर तर सद्यस्थितीतदेखील आपण सारेच अनुभवत आहोत, परंतु भविष्यात, अर्थ/हेतु पुरस्कृत व्हिडीओ-माहिती व फेक न्यूजच्या भडिमाराने मानवाचे मन- बुद्धी सुस्थितीत ठेवण्यासाठी मानसोपचार यंत्रणा अधिक सक्षम व प्रबळ करण्याची गरज भासल्यास आश्चर्य वाटू नये. सर्व-प्राणिमात्रांत विलक्षण बुद्धिमत्ता हा मानवी विशेष आहे. परंतु येत्या काळात प्रकर्षाने चिंता वाटते ती अशी की, इंटरनेटचा अवाजवी वापर केल्यास मानवी बुद्धिमत्तेवर त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळेल की काय? प्रगतीचे दुष्टचक्र होण्यापासून थांबवणे अद्याप तरी मानवाच्या हातात आहे… कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पाय पाळण्यात दिसू लागले आहेत! नेट न्यूट्रॅलिटी म्हणजे इंटरनेट सेवा पुरविणाऱ्यांची तटस्थता, माहिती व उपकरणांची एकाधिकारशाही, असमानता-विषमता, डिजिटल विभाजन तसेच राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक- विभाजन जग अनुभवत असताना खरा प्रश्न आहे तो हा की, इथून पुढे आपण इंटरनेटचं नेमकं काय रूप अनुभवणार आहोत आणि त्यामुळे आपलं जीवनमान कसं प्रभावित होणार आहे? खरं तर, इंटरनेटच्या बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेतील स्थित्यंतराच्या वाटेत आपण सारे उभे असल्याने काहीसे संभ्रमावस्थेत सापडलो आहोत. इंटरनेट जरी वेगानं बदलत असलं तरी यंत्राचा वेग आणि मानवी मानसिकता आणि बदलाची स्विकारता यांचा वेग यात नैसर्गिक फरक लक्षात घेणं अपरिहार्य आहे. भविष्यातील इंटरनेटचा आशादायी विचार करताना, सर्वप्रथम म्हणजे स्पीड – अर्थात इंटरनेटचा वेग. २०२० च्या मे महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांनी ४४.२ टेराबाईट्स प्रति सेकंद इतका इंटरनेटचा विक्रमी वेग नोंदवला. म्हणजे साधारणतः एच.डी. गुणवत्तेचे १००० चित्रपट मायक्रोसेकंदात डाउनलोड होतात. प्रयोगशाळेत होत असलेलं संशोधन भविष्यात सर्वसामान्यांपर्यंत नक्कीच अपेक्षित आहे. दुसरं म्हणजे एल.टी.ई, वायमॅक्स सारख्या वायरलेस तंत्रज्ञानामुळे अनेक प्रकारच्या केबल्सच्या जाळ्यापासून आपली सुटका तर होईलच परंतु इंटरनेटचा प्रसार खेडोपाडी सर्वदूर-व्यापक होईल आणि जवळपास ९०-९५% लोकसंख्येचे जीवनमान प्रभावित करेल. प्लैनेट डॉट कॉमचे निर्माते विल मार्शल यांच्या दाव्यानुसार आपण आज जसे गुगलवर वेब सर्च करतो तसे भविष्यात प्लैनेटवर भौतिक वस्तूंचा शोध घेऊ शकतो. व्यक्तिगत माहिती व गोपनीयता सारखे मुद्दे भविष्यात कालबाह्य ठरतील. किंबहुना प्रगत तंत्रज्ञानासोबत जग/व्यवहार अधिकाधिक पारदर्शी बनत जातील. विश्वासाहर्ता वृद्धिंगत होत जाईल. कला, आरोग्य, शिक्षण सारख्या विषयांचं खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण होईल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ जारोंन लैनीअर यांच्या म्हणण्यानुसार तंत्रज्ञान कंपन्यांनी तंत्रज्ञान विकसित करताना भांडवलदारांचा विचार करण्याऐवजी, त्या तंत्रज्ञानाचा वापरकर्ता प्रक्रिया-प्रतिसादातून अधिक

कसा शिकू शकेल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यामुळे, व्यवसाय-व्यापारातील मक्तेदारी संपुष्टात येईल. वारंवार कराव्या लागणाऱ्या शारीरिक व मानसिक कष्टांपासून मानव मुक्त होईल. अधिकतम कामं मानवी हस्तक्षेपाशिवाय पार पडतील. त्यामुळे मानवी-मूल्य, नाते-संबंध जपण्यासाठी, जीवन-जगण्याचा खरा अर्थ शोधण्या-समजण्यासाठी मानवाकडे उसंत असेल. आजवर न उकललेल्या अनेक गूढ व रहस्यमयी प्रश्नांची उत्तरं मिळविण्यासाठी यंत्रच मानवाला मदत करतील. ५जी, वायफाय ६, एल.टी.ई. आय.ओ.टी., ए.आय., व्ही.आर., ए.आर. ह्या इंटरनेटच्या केवळ बाल्यावस्था आहेत. भविष्यातील इंटरनेटमध्ये फक्त पृथ्वीच नाही तर चंद्र, मंगळ किंबहुना संपूर्ण गॅलेक्सी – अर्थात आकाशगंगा सॅटेलाईट्स माध्यमातून जोडण्याचे सामर्थ्य असणार आहे. सर्व जग अनेक हिस्स्यांत वाटलं गेलेलं असताना, संपूर्ण जगाला एका धाग्यात बांधत विश्वशांतीचा अनुभव देण्याचं सामर्थ्य इंटरनेट तंत्रज्ञानात आहे. ते युनिव्हर्सल आहे. येस, इंटरनेट- कॅन-युनाईट-द-वर्ल्ड. इंटरनेट हा एकूणच तंत्रज्ञानाच्या उपयोगीतेसाठीचा हाय-वे आहे. त्यामुळे अशा सामर्थ्यशाली साधनावर आधारित यंत्र-यंत्रणा आणि मूलभूत-संरचना अखंड विश्वाच्या कल्याणासाठी सर्व देशांतील तंत्रज्ञ व सरकारांनी एकत्रित व सुनियोजित, सर्वंकष, सर्वसमावेशक, ओपन-सोर्स, मोफत आणि मुक्त अशी तंत्रज्ञान-रणनीती तयार करुन ती आमलात आणणं क्रमप्राप्त आहे.

फ्लॅशबॅक… १८३६ मध्ये टेलिग्राफ पेटंट केले गेलं. १८६६ मध्ये ट्रान्सअटलांटिक केबल सुरु झाली. १८७६ मध्ये अलेक्सान्डर ग्रॅहम बेल यांनी टेलिफोनचे प्रात्यक्षिक सादर केलं. १९५७ मध्ये युनियन सोव्हियत सोसायलिस्ट रिपब्लिक ने स्फुटनिक नावाचा पहिला मानवनिर्मित उपग्रह अवकाशात सोडला. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या संरक्षण विभागाने १९५८ मध्ये ए.आर.पी.ए. अर्थात ऍडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सीची स्थापना केली. १९६२ मध्ये एम.आय.टी. अर्थात मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ जे.सी.आर.लीकलायडर यांनी संगणकांच्या गॅलॅक्टिक नेटवर्क चा शोध लावला. इथं खऱ्या अर्थाने इंटरनेटची मुहूर्तमेढ रोवली गेली. युद्धजन्य परिस्थितीत शत्रुपक्षाने टेलिफोन-केबल-नेटवर्क जरी उध्वस्त केलं, तरी संवाद कायम ठेवण्यासाठी संगणकांच्या गॅलॅक्टिक नेटवर्कचा सुरक्षित वापर केला जाऊ शकतो असा प्रस्ताव एम.आय.टी. च्या शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या संरक्षण-विभागाला दिला. १९६५ मध्ये पॅकेट-स्विचिंग तंत्रज्ञानाचा वापर करून एका संगणकाकडून दुसऱ्या संगणकाला संदेश पाठविणारी ए.आर.पी.ए.एन.ई.टी. किंवा आरपानेट प्रणाली जन्माला आली. २९ ऑक्टोबर १९६९ ला आरपानेटने जगातील पहिला संदेश एका संगणकावरून दुसऱ्या संगणकाला पाठविण्यात यश मिळवलं. १९७० च्या शेवटास व्हिन्टोन सर्फ या शास्त्रज्ञाने टी.सी.पी. अर्थात ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉलचे संशोधन केलं व संगणकांचे मिनी-नेटवर्क अर्थात लघु-आंतरजाल तयार झालं.

सुरुवातीला केवळ चार संगणक जोडलेल्या आरपानेट प्रणालीला पुढे १९७१ मध्ये हवाई विद्यापीठ व नंतर लंडन विद्यापीठसोबत जोडले गेलं. १९९१ मध्ये स्वित्झर्लंडचे संगणक-प्रणाली अभियंता टीम बर्नर्स-ली यांनी डेटा-फाईल्स पाठवू शकेल असे डब्लू.डब्लू.डब्लू. अर्थात वर्ल्ड-वाईड-वेब विकसित केलं. त्यालाच आज आपण इंटरनेट म्हणतो. तेंव्हापासून इंटरनेट अनेक प्रकारे बदलत गेलं. १९९२ मध्ये इल्लिनॉईस विद्यापीठातील विद्यार्थी-संशोधकांनी वेब-पेजेस सर्च करता येतील असे मोझियक वेब बाऊझर विकसित केलं, पुढे तेच नेटस्केप नेव्हीगेटर म्हणून प्रसिद्ध झालं. आणि त्याच वर्षी अमेरिकन-काँग्रेसने वेबचा व्यावसायिक वापर करण्याचे घोषित केल्याने अनेक संस्था व उद्योग-जगताने इंटरनेटद्वारे आपल्या ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली. त्यापुढील काळ इंटरनेट-तंत्रज्ञान विकास व त्यावर आधारित सर्च-इंजिन, इ-कॉमर्स तसेच सोशिअल मेडियासारख्या सोयी-सुविधांचा काळ राहिला तो आजतागायत!

  • Sunil Khandbahale

Originally published at https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/yes-internet-can-unite-the-world-127617031.html

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *